Uddhav Thackeray meets Chief Minister Devendra Fadnavis at Vidhan Bhavan in Nagpur
उद्धव ठाकरे यांची नागपुरात विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
भेटींमध्ये कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं ठाकरे यांच स्पष्टीकरण .
नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला मोठा विजय मिळाला. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी मुंबई येथे पार पडला. या शपथविधीसाठी माजी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनाही निमंत्रण देण्यात आले होते. मात्र उद्धव ठाकरेंसह विरोधी पक्षातील अनेक नेते शपथविधीला हजर राहिले नाहीत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना फोन करून निमंत्रण दिले होते. मात्र विरोधकांमधून कुणीही यावेळी उपस्थित राहिले नाही. याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधीनंतरच्या पत्रकार परिषदेत भाष्य केले होते. यानंतर आज हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी अनिल परब, आदित्य ठाकरे, वरूण सरदेसाई आणि सचिन अहिर यांच्यासह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि महायुतीच्या विजयाबद्दल अभिनंदन केलं.
सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संवादाची या राज्याला दीर्घ परंपरा आहे. त्यांच्या नेतृत्त्वाखाली राज्याची आणखी प्रगती होईल, अशा शुभेच्छा दिल्याचं उद्धव ठाकरे यांनी या भेटीनंतर वार्ताहरांना सांगितलं. त्यानंतर ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली आणि अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. या भेटींमध्ये कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
उद्धव ठाकरे यांनी अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला केवळ ४९ जागा मिळाल्या आहेत. यात शिवसेनेला सर्वाधिक २० जागा जिंकता आल्या आहेत. विरोधी पक्षनेतेपदासाठी विधानसभेच्या एकूण सदस्यसंख्येपैकी १० टक्के जागा जिंकणे गरजेचे आहे, असा पायंडा आहे. मात्र एकाही पक्षाला २९ जागा जिंकता आलेल्या नाहीत. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील. या पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरेंनी भेट घेतल्याचे सांगितले जाते. या भेटीनंतर त्यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचीही भेट घेतली.
त्यापूर्वी वार्ताहर परिषदेत ठाकरे यांनी एक देश एक निवडणूक संकल्पनेला विरोध केला. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ईव्हीएमच्या विरोधाला आणि मतपत्रिकांद्वारे मतदान घेण्याच्या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा
One Comment on “उद्धव ठाकरे यांची नागपुरात विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट”